डेपो सुरू करण्याची मागणी
बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अणे पठाराच्या परिसरातील बंधारे पावसाअभावी कोरडेठाक पडले असून, जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. दरम्यान अणे पठारावरील गावांमध्ये जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी, अणे ग्रामपंचायत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे.
अणे पठारावरील अणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा आदी परिसरात काही ठिकाणी पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरण्या होऊनही पिकांची उगवण झालेली नाही. तर जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाळा लांबला तर रब्बी हंगामही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, खरिपात बाजरी अन् कडधान्ये तर रब्बीमध्ये ज्वारी बरोबर हरभरा हीच पिके घेतली जातात.
पठार भागावर वाटाणा पिकाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. या दुष्काळी परिस्थितीवर अणे ग्रामपंचायतीमध्ये (दि. 27) बैठक आयोजित केली होती. यावेळी जुन्नर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश शेजवळ, सहायक बिडीओ अर्चना कोल्हे, गट विकास अधिकारी शरद माळी,कृषी सहाय्यक महाले,पशू पर्यवेक्षक डॉ. भागवत, अणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, तलाठी, ग्रामसेवक, अजित आहेर, ज्ञानेश्वर संभेराव, समाजसेवक प्रशांत दाते उपस्थित होते. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
1 हजार 329 जनावरे
अणे परिसरातील शेतकऱ्याचे पशुधन साठी लागणारा चारा पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तरी जनावरांना दररोज लागणारा चारा हा बेल्हे, साकोरी, निमगावसावा, ओतूर, मांजरवाडी आदि ठिकाणाहून विकत आणावा लागतो. शासन नियमानुसार मोठ्या जनावरांना एका जनावरांसाठी 18 किलो प्रती दिनी तर लहान जनावरांना प्रति दिनी एका जनावरांसाठी 9 किलो एवढा चारा लागतो.
तसेच अणे गावात लहान मोठे जनावरे धरून एकूण 1 हजार 329 इतकी जनावरे आहेत. महसूल गाव आनंदवाडी येथे लहान मोठे जनावरे 755 इतके आहेत; परंतु पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना चारा जास्त दरात विकत घ्यावा लागतो. तरी कृपया अणे आनंदवाडी या ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी माहिती सरपंच प्रियांका दाते यांनी दिली.
परिसरात शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या आहेत. पण चोळीचा बंधारा कोरडा पडला असून या परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही तर फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. या परिसरात मी बुधवारी (दि. 26) प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अणे पठारावरील गावांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई जाणवत असून, या परिसरात जनावरांसाठी तात्काळ चारा डेपो सुरू करावा.
– पांडुरंग पवार, माजी सदस्य, जिल्हा परिषद