पिंपरी – ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्म्ट, तसेच धोकदायक पद्धतीने दुचाकी चालविणाऱ्या 127 दुचाकी चालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तसेच तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालयाबाहेर करण्यात आली.
“अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी’ या शिर्षकाखाली बुधवारी (दि. 26) दै.”प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीसंदर्भात प्रतिक्रिया देताना वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी लवकरच शाळा महाविद्यालयाबाहेर कारवाईची मोहिम हाती घेतली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. 27) पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालय बाहेर पिंपरी वाहतूक विभागाकडून कारवाईला सुरवात झाली. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे, पिंपरी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक अर्जुन पवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कारवाईला सुरवात झाली. यावेळी मोटार वाहन कायद्या नुसार 127 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी ट्रिपल सीट जाणाऱ्या 18 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना 18 हजारांचा दंड करण्यात आला. धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवून ट्रीपल सीट जाणाऱ्या तसेच वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहनाची कोणतीही कागदपत्र नसलेल्या तीन जणांवर भा.द.वि. कलम 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेटच्या दोन, विना हेल्मेटच्या 23, वाहन परवाना नसलेल्या आठ जणांवर तसेच नो-एन्ट्रीतून येणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालकांना एक लाख 23 हजार 300 रुपयांचा दंड करण्यात आला. केवळ ट्रिपल सीटच नव्हे तर एकाच दुचाकीवरून चारजण प्रवास करताना मिळून आले. त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
नवीन दुचाकीला दहा हजारांचा दंड
एक अल्पवयीन मुलगा बुलेट चालविताना मिळून आला. तसेच नवीन घेतलेल्या बुलेटचे कागदपत्र देखील मिळालेले नव्हते. या बुलेटस्वाराला 10 हजारांचा दंड आकारण्यात आला.
पोलिसांचाही गनिमी कावा
पुढे पोलीस कारवाई सुरू असल्याचे दिसताच काही मोटरसायकलस्वार यू-टर्न मारून माघारी फिरत होते. त्यांना अडविण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या नाक्यावर पोलीस उभे होते. पळून आलेल्या दुचाकीस्वारांवर ते पोलीस कारवाई करीत होते.
बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे व अपघाताचे प्रमाण कमी करणे, हा या कारवाईमागचा हेतू आहे. कारवाई केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या करिअर होईल, याबाबत अल्पवयीन मुलांच्या पालकांना फोन करून संभाव्य कडक कारवाईची माहिती देण्यात आली. आगामी काळात शहराच्या विविध भागातील महाविद्यालयांच्या बाहेर अशी कारवाईची मोहीम घेण्यात येणार आहे.
– विठ्ठल कुबडे, सहायक आयुक्त-वाहतूक विभाग
स्थानिक दुकानदारांकडून पोलिसांचे अभिनंदन
पिंपरीगावात बेशिस्त दुचाकीस्वारांची संख्या वाढली होती. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे स्थानिक दुकानदारांकडून पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच वारंवार अशी कारवाई केल्यास रॅश ड्रायव्हिंगला आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शंभर रुपये घेऊन प्रकरण मिटवून टाका
पोलीस ट्रिपल सीट कारवाई करीत असताना एका दुचाकीस्वाराने 100 रुपये घेऊन प्रकरण मिटवून टाका, असे सांगितले. मात्र आता शंभर रुपयात काय होते. हजार रुपये द्या, अन् पावती घेऊन जा, असे सांगतातच त्या दुचाकीस्वाराचा चेहराच पडला.