मुंबई – ऐशीच्या दशकातील रामानंद सागर यांच्या गाजलेल्या प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ आजही लोकांमध्ये पूर्वीइतकीच लोकप्रिय आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील सर्व पात्रे कायमची अजरामर झाली आहेत. या मालिकेत रामाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेत दिसलेली दीपिका चिखलिया लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की आजही प्रेक्षकांनी त्यांना पाहिले की त्यांना खऱ्या रामायणाचीच आठवण येते. ते आजही कुठेही गेले तरी लोक त्यांची श्रीरामप्रमाणे त्यांची देखील पूजा करतात. त्यांच्या पाया पडतात.
चाहते त्यांना पुन्हा देवाच्या भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता मात्र चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. लवकरच अभिनेते अरुण गोविल मोठ्या पडद्यावर देवाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. आदित्य ओम यांच्या चित्रपटात अरुण गोविल भगवान ‘विठ्ठला’ची भूमिका साकारतांना दिसणार आहेत. हा चित्रपट संत तुकारामांच्या जीवनावर आधारित आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत अरुण गोविल यांनी सांगितले की, ‘रामायण’ या चित्रपटात रामाची भुमिका साकारल्यानंतर त्यांना अनेक धार्मिक भूमिका साकारण्यासाठी ऑफर आल्या होत्या. मात्र त्या करण्यास ते तयार नव्हते. यावेळी त्यांनी ही भुमिका स्विकारली त्याला कारण होते ते संत तुकाराम..! या चित्रपटात ते देवाची भुमिका साकारणार आहेत मात्र ते देवाच्या रुपात दिसणार आहे. संत तुकारामांच्या आयुष्यात येणाऱ्या एका सामान्य माणसाच्या भूमिकेत ते दिसतील.
दरम्यान, यासोबतच अभिनेते अरुण गोविल अभिनेता अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’च्या सिक्वेलमध्ये भगवान रामची भूमिका साकारणार आहे. ‘OMG 2’ ची निर्मिती अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार करत आहेत, तर दिग्दर्शक अमित राय हे आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. रामायणापासून लोक अरुण गोविल यांना फक्त राम म्हणून पाहतात. ते जरी अभिनेते असले तरी लोक आजही त्यांच्या प्रभू रामचंद्रच शोधतात.