नांदेड – स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयातील सहायक संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. संतोष हणमंतरवा कंदेवार (वय 45,नांदेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. कंदेवार यांना 60 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
66 ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याचे काम दिल्याच्या मोबदल्यात कंदेवार यांनी तक्रारदारांकडे 70 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वर्ग एकचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष कंदेवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परिक्षण कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आहे. कंदेवार यांनी लाच मागितल्याबाबत 53 वर्षीय व्यक्तीने 13 जुलै 2023 रोजी नांदेड एसीबीकडे तक्रार केली होती.
कंदेवार यांनी नांदेड जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीचे सन 2021-22 चे लेखापरिक्षण करुन अहवाल सादर करण्याचे काम तक्रारदार यांना दिले होते. काम दिल्याचा मोबदला म्हणून ग्राम पंचायतीच्या खर्चानुसार ज्या ग्रामपंचायतीचे खर्च 5 लाख आहे त्यास एक हजार रुपये प्रति ग्रामपंचायत, ज्या ग्रामपंचायतीचे खर्च 10 लाखापर्यंत आहे त्यास दोन हजार रुपये प्रति ग्रामपंचायत व ज्या ग्रामपंचायतीचे खर्च दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यास 10 हजार रुपये प्रति ग्रामपंचायत असे एकुण 70 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी याबाबत नांदेड एसीबीकडे तक्रार केली. त्यावरुन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, सह संचालक संतोष कंदेवार यांनी तक्रादार यांना एकूण 70 हजार करुन टाक असे म्हटले. तक्रारदार यांनी काही कमी करा अशी विनंती केल्याने कंदेवार यांनी तडजोडी अंती 60 रूपयाची लाच मागणी दोन पंचासमक्ष केली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर कंदेवार यांच्यावर नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नांदेड लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.