पिंपरी – संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करूनही शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी वेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. शारीरिक इजा आणि चोरी अशाप्रकारचे दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांची स्वतंत्र यादी (“प्लस टू प्लॅन’) बनविण्यात आली आहे. या “प्लस टू प्लॅन’मध्ये एकूण दीड हजार गुन्हेगारांची माहिती संकलित केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पूर्वीच्या संघटित टोळ्यांची माहिती पुणे शहर पोलिसांकडून घेतली आहे. मागील सहा-सात वर्षांत त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी घटनांशी संबंध राहिला नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शहरातील नामचीन थंडावले असले तरीही शहरात घडणाऱ्या बऱ्याच गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येऊ लागला. पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नसलेल्यांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मुलांचा सहभाग उघड झाला. गुन्ह्याच्या तपासात अपेक्षा असणाऱ्यांपेक्षा वेगळीच नावे समोर येऊ लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे आता पोलिसांनी गुन्हेगारी मानसिकता आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात असणाऱ्या गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे रेकॉर्ड तयार केली आहे. तसेच, शरीर आणि मालाविरुद्ध दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांची यादी तयार केली आहे. याचा नियमित आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे.
गल्लीतील स्वयंघोषित भाईंवर नजर
दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्यांची यादी 1551 इतकी असल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. याच्या काही पट अधिक गल्लीतील टपोरी असण्याची शक्यता आहे. अशांवर देखील विशेष लक्ष असणार आहे.
वचक निर्माण करण्याचा प्रयत्न
तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची त्यांच्याच परिसरात धिंड काढल्याने त्यांची नाचक्की होते. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील काही दिवसात अनेक गुन्हेगारांची अशाप्रकारे धिंड काढली आहे. त्यामुळे टवाळखोरीला काही अंशी आळा बसला. सोशल मीडियावर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पोलिसी भाषेत समज देण्याचे काम सुरू झाले आहे.
शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या पाठीमागे असणाऱ्या “व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांची देखील गोपनीय माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात त्यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे.
– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.