मुंबई :- ठाकरे गटाच्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हेंनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
दरम्यान, सकाळीच संजय राऊत यांनी “शिंदे गटातले 17 ते 18 आमदार संपर्कात आहेत. आजही त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोलले” असा मोठा दावा केला होता आणि त्यानंतर काही तासातच निलम गोऱ्हेंनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
निलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर आणि संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा संदर्भ घेत
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊतांवर (Sanjay Raut) खोचक टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी Tweet मध्ये म्हटले आहे की,” ‘उठा’ठेवी करणाऱ्यांचा आणखी एक गडी आऊट..!दिवसेंदिवस पक्षाला गळती लागत असतानाही, शिंदे गटाचे १७-१८ आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या सर्वज्ञानींच्या कॉन्फिडन्सला दादच द्यायला हवी..” असं खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच “कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं..? “असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत …?
“शिंदे गटातले 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे खोटं असेल तर पुन्हा शिवसेनेचं नाव घेणार नाही. तिकडचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. आजही त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोलले,” असा दावा संजय राऊत यांनी केला होता.