मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत ९ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडले आहे. एक गट हा अजित पवार यांना पाठिंबा देणारा आहे. तर एक गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पाठीशी उभा राहणारा आहे. यामुळे आता राष्ट्रवादीतील वाद समोर आले आहेत.
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून वाद निर्माण झाला. अजित पवारांच्या समर्थकांकडून शरद पवारांचे फोटो वापरण्यात येत आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांनीही फोटो न लावण्याचा इशारा दिला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला. यावर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर “जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरू नका, तर विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर आता अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नये. शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली नाही. मात्र काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्यासाठी त्रासदायक आहे. शेवटी पवारसाहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत.”
शरद पवार काय म्हणाले होते?
“मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.