सातारा – मुंजवडी (ता. फलटण) येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रुचून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून पाच लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकलसह सहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी बालासो रामचंद्र रणदिवे (वय 50, मुंजवडी, ता. फलटण) याच्यासह पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुंजवडी (ता. फलटण) येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. मुंजवडी येथील माध्यमिक शाळेजवळ पोलिसांनी सापळा रचला. तेथे आलेल्या बाळू गणपत कदम (वय 51 रा. कुरबाबी ता. माळशिरस) याला पोलीसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशीत रणदिवे याचेही नाव आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य प्रतिबंधक अधिनियम 1985 कलम आठप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्निल दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी भाग घेतला होता.