नागपूर – नागपूरमध्ये शनिवारी बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता-खेळता बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आलिया फिरोज खान आणि आफरीन इर्शाद खान या दोघींचे वय सहा वर्षे होते तर तौसिफ फिरोज खान चार वर्षांचा होता. फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ ते राहत होते.
शनिवारी दुपारी खेळत असताना तिघेही बेपत्ता झाले. यानंतर नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला तरी सापडले नाहीत. अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली. याबाबत पोलिसांनी सोशल मीडियावरूनही आवाहन केले होते.
दरम्यान, रविवारी दुपारनंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा श्वानाने एका नादुरुस्त असलेल्या कारजवळ इशारा केला. पोलिसांनी कार पाहिली असता तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले.
त्यांना रुग्णालयात नेण्यात असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. हसत्या खेळत्या चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पालकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
घटनास्थळाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार एकाच जागी बऱ्याच दिवसांपासून उभा होती. खेळताना मुले आत गेल्यानंतर ती लॉक झाल्याची शक्यता आहे. तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे कारचे तापमान वाढल्याने मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.