वॉशिंग्टन – भारतातील प्रथा आणि परंपरा याचे जगभरातील सर्वच देशांना आणि तेथील नागरिकांना आकर्षण आहे. भारतात होणाऱ्या लग्न समारंभातील विधी आणि तेथील एकूण सोहळा याबाबत परदेशी नागरिकांना आकर्षण आहे. आता याच आकर्षणातून अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये तेथील विद्यार्थी नकली लग्न करत असून संपूर्ण लग्न विधी पार पाडत आहेत. लग्न समारंभामध्ये वर किंवा वधू सुद्धा खरे नसतात किंवा वरातही खरी नसते. फक्त एक गंमत म्हणूनच हे नकली लग्न पार पाडले जाते.
कोलंबिया, ओरेगॉन, न्यूयॉर्क, टेक्सास, स्टॅंडर्ड या सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना भारतीय विवाहपरंपरेचे आकर्षण वाटत आहे. या विद्यापीठांमध्ये त्या नकली लग्नाचा ट्रेंड जोर धरत आहे. काही लग्न समारंभामध्ये शेरवानी सारखा पेहराव करून एखादा नकली वर घोड्यावर स्वार होतो आणि त्याची वरात निघते.
विशिष्ट ठिकाणी त्याची खोटी वधू दागिने आणि चांगले कपडे घालून वाट पहात असते. नकली वर आणि वधू व्यासपीठावर जातात आणि तिथे लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातात. या लग्न समारंभा पूर्वी हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ, संगीत समारंभ हे सर्व विधीही पूर्ण केले जातात. सहभागी होणारे वधू आणि वर एकमेकांना कधी भेटलेलेही नसतात पण हा सर्व मामलाच खोटा आणि नकली असल्यामुळे कोणालाच त्याबाबत आक्षेप नसतो.
एकाच लग्न समारंभामध्ये चार वधू आणि चार वर यांचे पण नकली लग्न केले जाते. विद्यापीठांशी संलग्न अनेक महाविद्यालयांमध्ये आता अशा प्रकारचा लग्न समारंभ हा एक वार्षिक उत्सव बनू पहात आहे. महाविद्यालयांवर अनेक आशियाई विद्यार्थ्यांचाच प्रभाव असल्याने या सर्व गोष्टी पुढे येत आहेत. पूर्ण एका सोहळ्याचा आणि खेळासारखाच भाग असल्याने महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील अधिकारी सुद्धा या समारंभाला आक्षेप घेत नाहीत.