कोथरूड – पालिकेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुढील 40 दिवस वातानूकुलित (एसी) यंत्रणेसह आवश्यक दुरूस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे रसिकांना पुढील दीड महिने सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. मात्र, उशिरा का होईना या कामाला मुहूर्त मिळाला आणि कामाला सुुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी प्रतिक्षा करू, भविष्यात रसिकांसह कलाकारांनाही त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कलाकारांसह रसिकांनी व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेचे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दि. 6 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे. पुणे हे सांस्कृतिक राजधानी असलेले शहर आहे. त्यातही कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह म्हणजे कलावंतांना रसिकांची भरभरून दाद मिळते. यामुळे या नाट्यगृहाला नेहमीच कलारांकडूनही मोठी मागणी असते. दोन ते तीन महिने अधीच नाट्य प्रयोगांचे बुकिंग झालेले असते. मात्र, मागील 20 वर्षांपासून सुरू असलेली एसी यंत्रणा मागील काही महिन्यांपासून सतत बिघडत आहे. याबाबत कलाकारांनीही वारंवार नाराजी व्यक्त करत, एसी यंत्रणा व्यवस्थित करण्याची मागणी केली होती.
या नाट्यगृहात प्रत्येक महिन्याला 60 ते 70 प्रयोग होत असतात. मात्र, आता 40 दिवस नाट्यगृह बंद असल्यामुळे रसिकांना नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील इतर नाट्यगृहांमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे काही दिवस गैरसोय होईल, परंतु, काम पूर्ण झाल्यावर कलाकार आणि रसिकांना पुढील प्रयोग त्रासाविना पाहता येतील.
संपूर्ण नाट्यगृहातील एसी यंत्रणा आणि अन्य दुरूस्तीच्या कामासाठी
40 दिवस नाट्यगृह बंद असेल. पावसाळ्यात नाटकाचे प्रयोग संख्या तुलनेने कमी असतात. त्यामुळे जुलैमध्ये हे काम करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार दि. 6 जुलैपासून कामाला सुरवात होईल. मात्र, दिलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण व्हावे. या दरम्यान 20 ते 22 प्रयोग बुक झालेले आहेत, असे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे व्यवस्थापक सत्यजित धांडेकर म्हणाले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेलो नाही, असा एकही दिवस नाही. कालांतराने नाट्यगृहाची दुरूस्ती करणे आवश्यक आहेच. यासाठी आमच्यासह रसिकांना काही काळ वाट पहावी लागेल. मात्र, प्रशासनानेही लवकरात लवकर काम पूर्ण करावे. आम्हाला सुखद धक्का देत 40 दिवसांचे काम महिनाभरात पूर्ण करून नाट्यगृह पुन्हा खुले करावे, एवढीच अपेक्षा आहे, असे गायक सलील कुलकर्णी म्हणाले.