राहुरी – भारतीय सैन्य दलातील जवान योगेश बाळासाहेब पटारे (वय 27, रा. उंबरे) यांचे काल पिंपरी अवघड शिवारात रस्ते अपघातात निधन झाले. त्याच्या पार्थिवावर काल उंबरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील आणि दीड महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.
सैन्य दलात नाईक पदावर असलेला योगेश पटारे याची पठाणकोटहून हैदराबादला बदली झाली होती. पंधरा दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या दीड महिन्याच्या बाळाला भेटण्यासाठी तो उंबरे येथे आला होता. सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या एका विवाह समारंभास हजर राहण्यासाठी दुचाकीवर तो त्याचा मित्र पवन राजेंद्र उंडे याच्यासह श्रीरामपूर येथे गेला होता.
विवाह समारंभातून दुचाकीवरून परतताना पिंपरी अवघड शिवारात उड्डाणपुलानजीक टोल नाक्यावर समोरून येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला धडक दिली. त्यात योगेश जागीच ठार झाला. त्याचा मित्र पवन उंडे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नगर येथील दवाखान्यात उपचार चालू आहेत. पटारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. या वेळी तहसीलदार चंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. शिवाजी कर्डिले व सैन्य दलातील अधिकारी हजर होते. चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
शनिशिंगणापूर ते राहुरी या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदोष कामामुळे या रस्त्यावरील अपघातात वाढ झाली आहे. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.