बेंगळुरू- कॉंग्रेस अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नाहीसे करण्याचा कट भाजपच्या एका उमेदवारान रचला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरर्जेवाला यांनी केला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सुरर्जेवाला यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग पत्रकारांसमोर सादर केले आहे. ज्यामध्ये भाजप उमेद्वार खर्गे, त्यांची पत्नी आणि मुलांचा नायनाट करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे.
दरम्यान राठोड यांनी हा आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले की, पराभवाच्या भीतीने कॉंग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे, आणि ते सादर करीत असलेली ऑडिओ क्लिप बनावट आहे. सुर्जेवाला यांनी ही ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवून नमूद केले की या सारखी गंभीर अन्य कोणतीही बाब असू शकत नाही. आपण खर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्धवस्त करणार आहोत असे भाजपचा उमेदवार सांगताना दिसत असून कर्नाटकात निवडणुकांच्या राजकारणातून भाजप कोणत्या थराला गेली आहे हे यातून स्पष्ट होते आहे असे सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षावर कन्नडिगांच्या सर्वांगीण आशीर्वादांचा वर्षाव होत असल्याने आणि आगामी कर्नाटक निवडणुकीत भाजपला संपूर्ण पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याने घाबरलेले भाजप नेते आता श्री मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत आहेत, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.चित्तापूरचा हा भाजपचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा अत्यंत लाडका आणि निकटवर्तीय उमेदवार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.