औंध -बाणेर परिसरात स्मार्ट सिटी तसेच पुणे महापालिकेतर्फे रस्ते विकसित झाले. स्मार्ट सिटीतर्फे परिसरामध्ये अनेक मुख्य रस्ते चकाचक करण्यात आले. पदपथ देखील करण्यात आले आहेत. परंतु, बाणेरमध्ये एकीकडे विकसित झालेले मुख्य रस्ते तर दुसरीकडे मात्र बाणेर येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था असे “सरकारी कामाचे मृगजळ’ दिसत आहे. या विरोधात नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. जयेश मुरकुटे फाउंडेशनतर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बाणेर परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासात्मक कामे सुरू असली तरी ती मुख्य रस्ते अथवा ठराविक ठिकाणी होत आहेत. अनेक रस्त्यांची कामे अर्धवट राहिलेली आहेत. पॅन कार्ड क्लब रोड तसेच बाणेर येथील टेकडी जवळील अनेक सोसायट्यांना अजून देखील रस्त्यांच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रस्ते अर्धवट तयार करून ठेवलेले आहेत. या सरकारी कारभारा विरोधात जयेश मुरकुटे फाउंडेशन तर्फे परिसरातील नागरिकांना एकत्र करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत निषेधाचे बोर्ड घेऊन नागरिकांनी परिसरामध्ये फेरी मारली. लवकरात लवकर हे अपूर्ण राहिलेले रस्ते पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी जयेश मुरकुटे यांनी केली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.