नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितपटाने देशभरात एकच गोंधळ सुरु आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. हे सर्व सुरु असताना बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्या दरम्यान अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीमध्ये ५० हून अधिक या अधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.
Income Tax department is conducting survey at the BBC office in Delhi: Sources pic.twitter.com/vqBNUUiHTD
— ANI (@ANI) February 14, 2023
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहिती पटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे.
याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.