मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर सर्वजण ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत होते. खरं तर पैठणी हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच पैठणीच्या या गोष्टीची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता.
दरम्यान, अश्यातच आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. सर्वसामान्यांना साधी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि त्यातच एका स्त्रीचा तिची पहिली पैठणी हा जिव्हाळ्याचा विषय आता तुम्हाला ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे.
स्वतः या चित्रपटातील अभिनेत्री ‘सायली संजीव’ हिने याबद्दल माहिती दिली आहे. “गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वांत सुंदर भेट आहे..’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सायली संजीवने दिली आहे.
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नसेल. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे.