बेल्हे – ओतूर (ता.जुन्नर) येथे गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ओतूर पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किंमतीचा १८ किलो गांजा व ३ लाख ५० हजार किंमतीची गाडी असा ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व ओतुर पोलीस यांनी संयुक्तपणे ओतूर येथील कॉलेजसमोरील रस्त्यावरील गतिरोधकाजवळ सापळा लावून गाडी थांबवून (एमएच ०२ बीआर ८०९०) झडती घेतली. यावेळी वाहनामधील ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांकडे ३ लाख १० हजार किंमतीचा १८ किलो गांजा आढळून आला. याबाबत ओतुर पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी संदिप वारे यांचे फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश किसन वामन (वय ३२, रा. काळवाडी, ता. जुन्नर) व सतीष अशोक गुंजाळ (वय २६, रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. २) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी दिपक साबळे व अक्षय नवले यांना अहमदनगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्गवरून एटीओस कंपनीच्या ग्रे रंगाच्या गाडीमधून गांजाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली.