निवारी, (मध्यप्रदेश) – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी मध्यप्रदेशात संपुर्ण दारूबंदीच्या मागणीसाठी आज अनोखे आंदोलन केल्याचे पहायला मिळाले. त्यांनी ओरच्छा गावात काही भटक्या गायी एकत्र करून त्या तेथील दारू दुकानाच्या समोर बांधल्या.
लोकांनी दारू ऐवजी गायीचे दूध प्यावे असे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील दारूपिण्याच्या प्रकाराच्या विरोधात त्या सतत आवाज उठवत असून मध्यप्रदेशात संपुर्ण दारूबंदी जाहीर करावी अशीही त्यांची मागणी आहे.
राज्य सरकारने लोकांच्या दारूपिण्याच्या सवयीचा लाभ घेऊन महसुल जमा करण्याचा उद्योग करू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे. दुकानापुढे गायी बांधल्यानंतर त्यांनी शराब नही दूध पिओ अशी घोषणाही दिली.
उमा भारतींचे हे रूप पाहून दारू दुकानदाराने तातडीने आपल्या दुकानाचे शटर ओढून घेतले मागच्यावेळी त्यांनी या दुकानावर गायीचे शेण टाकले होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या 26 जानेवारीच्या भाषणात राज्यात नवीन उत्पादन शुल्क धोरण राबवण्याची घोषणा केली आहे. त्यात लोकांना दारूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.