पिंपरी, दि. 2 – चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. नुकतेच पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती करण्यात आली असून बुधवार (दि. 1) पासून महाळुंगे एमआयडीसी ठाण्याचा स्वतंत्र कारभार सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
महाळुंगे एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. दरम्यान काही तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून म्हाळुंगे एमआयडीसीचा पोलीस चौकी प्रमाणे कारभार सुरू होता. नुकतीच महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची हदद निश्चिती अधिसूचना निर्गमित करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्रपणे कारभार सुरू करण्यातील अडसर दूर झाला. त्यानुसार, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे बुधवार (दि. 1) पासून स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले आहे.
यापूर्वी म्हाळुंगे एमआयडीसी येथे फिर्याद घेऊन चाकण पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंदवण्यात येत होते. मात्र, आता स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्याने बुधवार (दि. 1) पासून म्हाळुंगे एमआयडीसी येथेच गुन्हे दाखल होतील. ज्यामुळे तक्रारदारांचा वेळ वाचेल.
ज्ञानेश्वर साबळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
म्हाळुंगे पोलीस ठाणे