-अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव
– माकडांना खायला देताना सेल्फी घेताना गेला तोल
-घाटात वाघजाई मंदिर परिसरात घडली घटना
भोर -(जीवन सोनवणे) पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात, नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिकं रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आले आहे.अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव आहे. घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देतेवेळी सेल्फी घेत असताना ही घटना घडली होती. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी, पोलीस प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आलं होत.
त्यानंतर पहाटे सुमारे तीन वाजता अंधारात आणि दाट झाडा झुडपातुन हा मृतदेह दरीतून वर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात येतं होत. या घटनेत मृत्यू झालेले अब्दुल कुदबुद्दीन शेख हे मुळचे रा.एरंडी कोरंगळा जि. लातूर येथील असून, ते सध्या त्यांच्या पत्नीसह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते मंडणगड जि. रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर त्यांची पत्नी करंजावणे ता. वेल्हा येथे प्राथमिक शिक्षिका आहे.
भोरहून वरंध घाट मार्गे मंडणगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आसावा असा अंदाज स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची MH03 BE 7415 नंबर लाल रंगाची कार आढळली होती. त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला आहे. भोर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशनचे कर्मचारी उद्धव गायकवाड आणि विकास लगस पुढील तपास करत आहेत.