मुंबई – हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट संघर्ष पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या निशाण्यावर शिंदे गटातील मंत्री असल्याचं देखील दिसून आले. त्यानंतर मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवल्याचे वृत्त समोर आले. यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पुन्हा जोर धरणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिथे आवश्यकता आहे महाराष्ट्रात तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि ताबा मिळवणार अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनीं दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोगावले यांनी ठाकरे गटाच्या कार्यालायावर ताबा मिळवण्याबाबत भाष्य केले. सत्तेचा दुरुपयोग केला जात नाहीये,आमच्याकडं संख्याबळ आहे आणि संख्याबळाच्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करतोय असं गोगावले यावेळी म्हणाले. त्यांना समजायला पाहिजे,त्यांना अडचण वाटत असेल तर त्यांनी आमच्यात विलीन व्हावं. ते समजले नाय तर आम्ही त्यांना समजावू असा इशारा देखील यावेळी गोगावले यांनी दिला.
महाराष्ट्रातील अशज किती कार्यालयावर दावा सांगणार असा सवाल गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले,”जिथं आवश्यकता आहे तिथं आमचे वरिष्ठ मंडळी जाऊन करेक्ट कार्यक्रम करतील”. एक एक झलक आहे अशा अनेक झलक त्यांना यावेळी पाहायला मिळतील असही गोगावले यावेळी म्हणाले. ठाकरे आणि शिंदे गटात न्यायालयात मोठी लढाई सुरु आहे. त्यासोबतच कार्यलयांवरून देखील आता वाद सुरु झाल्यामुळे ठाकरे-शिंदे गटातील वाद आणखी वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.