मुंबई – टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा ने सेटवरच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर संपूर्ण कलाविश्वात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मंगळवारी तुनिशाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील पार पडले. यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉयी अर्थात एफडब्लूआयसीईने महत्वाचे पाऊल उचलले. याबाबतची माहिती एफडब्लूआयसीईच्या अध्यक्षांनी दिली.
मनोरंजन इंडस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे मत एफडब्लूआयसीईचे अध्य्क्ष बी एन तिवारी यांनी व्यक्त केले आहे. अशा घटनांना गांभीर्याने घेऊन या घटना पुन्हा न घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तिवारी यावेळी म्हणाले. तसेच शूटिंगसाठी एवढा महागडा सेट उभारून देखील आता शूटिंग बंद आहे त्यामुळे निर्मात्यांची परिस्थिती काय असेल यावर देखील तिवारी यांनी यावेळी भाष्य केलं.
मेकअप रूममध्ये इतकी जागा नसते की कोणी तिथे आत्महत्या करू शकेल. सेटवर इतके लोक उपस्थित होते त्यांना कोणाला या आत्महत्येबाबत समजले कसे नाही ? असा सवाल देखील तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला. निर्मात्यांची बैठक घेऊन आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रत्येक सेटवर एक काऊन्सलर असावा ज्याला कलाकारांच्या मानसिक आरोग्याविषयी माहिती असावी असे काही उपाय देखील तिवारी यांनी यावेळी सुचवले तसेच तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांचं धक्का बसला असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगितले.