T20 World Cup 2024 (ENG vs OMA) : इंग्लंडची घातक कामगिरी, ओमानला अवघ्या 19 चेंडूत केलं पराभूत…

T20 World Cup 2024 (ENG vs OMA) : टी-20 विश्वकरंडक 2024 मधील 28 व्या आणि अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने ओमानचा दारूण पराभव केला आहे. इंग्लंडने हा सामना 8 विकेटने जिंकला. या विजयासह इंग्लंडने टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 च्या आशा कायम ठेवल्या आहेत.
ओमानविरुद्ध इंग्लंडने विक्रमी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना ओमानने केवळ 47 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने अवघ्या 19 चेंडूत लक्ष्य गाठले. या सामन्यासाठी आदिल रशीदची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
England get it done in Antigua 🇦🇬#T20WorldCup | #ENGvOMA | 📝 https://t.co/hrhtHZS64T pic.twitter.com/Jz4FbkIIvE
— ICC (@ICC) June 13, 2024
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेला ओमानचा संघ 47 धावांवर गारद झाला. त्यांचा एक खेळाडू वगळता इतर कोणीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. शोएब खानने 23 चेंडूंचा सामना करत 11 धावा केल्या. कर्णधार आकिब अवघ्या 8 धावा करून माघारी परतला. खालिद 1 धावा करून बाद झाला. यादरम्यान आदिल रशीदने इंग्लंडसाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. राशिदने 4 षटकात केवळ 11 धावा दिल्या. जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडने प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
अवघ्या 3.1 षटकांत गाठले लक्ष्य….
ओमानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने 3.1 षटकांत विजय मिळवला. मात्र, त्यांना त्यासाठी 2 विकेट्स गमवाव्या लागल्या. इंग्लंडकडून फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर सलामीला आले. यादरम्यान सॉल्ट 3 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. बटलर शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने 8 चेंडूत 24 नाबाद धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. विल जॅक 5 धावा करून बाद झाला. जॉनी बेअरस्टो 8 धावा करून नाबाद राहिला.
T20 World Cup 2024 : भारताच्या विजयामुळे पाकिस्तानला दिलासा…! PAK सुपर 8-च्या शर्यतीत कायम, मात्र…
इंग्लंड अजूनही सुपर 8 च्या शर्यतीत…
इंग्लंडने ओमानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे त्याचा नेट रन रेट लक्षणीय वाढला आहे. संघ अजूनही सुपर 8 पर्यंत पोहोचू शकतो. यासाठी त्यांना शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. इंग्लंडचा शेवटचा गट सामना नामिबियाविरुद्ध आहे. हा सामना 15 जून रोजी होणार आहे. ब गटातील गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यात स्कॉटलंडचा पराभव झाला तर इंग्लंडचा मार्ग सुकर होईल.





