वीसगाव खोरे (पुणे जिल्हा) – मुलीच्या जन्माला ओझं समजून तिचा जन्म नाकारणारे अनेक जण समाजात पाहावयास मिळतात. मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आजही पाहायला मिळतात. मुलगी वाचवण्यासाठी शासनाला कडक धोरण अवलंबवावे लागते; परंतु काही ठिकाणी आजही मुलीला लक्ष्मीचे प्रतिक मानून तिचे उत्साहाने स्वागत केले जाते आहे.
उत्रौली (ता. भोर) येथील अनंता बुदगुडे या शेतकऱ्याने आपल्या नातीची बैलगाडीतून मिरवणूक काढत कन्या जन्माचे स्वागत करत घरी आणले आहे. योगेश आणि साधना बुदगुडे यांच्या नंदिनी या कन्येचा राजेशाही स्वागत समारंभ पाहून उत्रौलीवासियांचे डोळे दिपून गेले.
अनंता बुदगुडे यांनी बैलगाडी सजवून आणि बैलांच्या पायात तोडे, कपाळावर बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा, चंगाळ,अंगावर झुल घालून बैलांनाही सजवले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नातीला घरी आणले.
यावेळी घरावर रोषणाई करण्यात आली होती, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या आणि परिसरात मिठाईचे वाटप केले होते. दरवाजात पुष्पवृष्टी करत सुवासिनींनी बाळाचे औक्षण केले. धान्याचे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या लाडक्या कन्येचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी कुंकवाच्या पाण्यात तिच्या पायांचे ठसे उमटवण्यात आले. या आगमनाची आठवण म्हणून केक कापून आनंद साजरा करण्यात आला.