Most Expensive Players – आयपीएल स्पर्धेचा लिलाव म्हटले की, स्टार खेळाडूंवर फ्रेंचायझींकडून पैशांचा पाऊसच पडतो. यामध्ये प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडूंचा जास्त प्रमाणात समावेश असतो. एखाद्या खेळाडूवर बोली लावण्याअगोदर त्याच्या अलीकडील काळातील कामगिरीचा जास्त विचार केला जातो. त्यामुळे जो खेळाडू लिलाव होण्याअगोदरच्या काही कालावधीत जबरदस्त कामगिरी करून दाखवेल त्याला मोठी रक्कम मिळण्याची संधी असते. असेच काहीसे यंदाच्या लिलावातही पाहायला मिळाले आहे.
आज कोच्ची येथे सुरु असलेल्या आयपीएल 2023च्या मिनी लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला मोठी रक्कम मिळाली. त्याची टी-20 विश्वचषकातील कामगिरी पाहता पंजाब किंग्जने त्याच्यासाठी 18 कोटी 50 लाख एव्हढी रक्कम मोजली. त्यामुळे सॅम करन हा यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
IPL 2023 Auction । सॅम करनवरील ऐतिहासिक बोलीनंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस; चाहते हैराण!
सॅम करन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी, इंग्लंडच्या बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी आणि वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंमध्ये मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटी रुपयांना संघात घेण्यात यश मिळवले.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील महागडे खेळाडू
IPL 2008 : महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2009 : केविन पीटरसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आणि अँड्र्यू फ्लिंटॉफला चेन्नई सुपर किंग्जने 7.55 कोटींना विकत घेतले.
IPL 2010 : कायरान पोलार्डला मुंबई इंडियन्सने आणि शेन बाँडला कोलकाता नाइट रायडर्सने 4.8 कोटी रुपयांना खरेदी केले.
IPL 2011 : गौतम गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सने 11.04 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2012 : रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने 9.72 कोटी रुपयांना खरेदी केले.
IPL 2013 : ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सने 5.3 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2014 : युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2015 : युवराज सिंगला दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींना विकत घेतले.
IPL 2016 : शेन वॉटसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 9.5 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2017 : बेन स्टोक्सला रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2018 : बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2019 : जयदेव उनाडकट राजस्थान रॉयल्सकडे आणि वरुण चक्रवर्ती पंजाब किंग्जकडे 8.4 कोटी रुपयांमध्ये गेला.
IPL 2020 : पॅट कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2021 : ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL 2022 : इशान किशनला मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले.
IPL 2023 : पंजाब किंग्सने सॅम करनला 18 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतला. त्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.