कोंढवा -महापालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून कोंढव्यात हॉस्पिटल व भाजी मार्केट बांधण्यात आले. मोठा गाजावाजा करीत उद्घाटनही झाले. परंतु, हे प्रकल्प सामान्यांसाठी खुले करण्यात आले नाहीत, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोफत भाजी वाटप, रस्त्यावरच प्रतिकात्मक उपचार करीत निषेध आंदोलन करण्यात आले.
मॉं खदीजा प्रसूतीगृह दवाखाना, हजरत अब्दुल रहमान ओटा मार्केट पालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. परंतु, हे प्रकल्प बंद असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार शिवसेनेचे नेते महादेव बाबर यांनी केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना मोफत भाजीचे वाटप तसेच प्रतिकात्मक डॉक्टर व रुग्ण बनवून रस्त्यावरच उपचार करण्यात आले. भाजी बाजार आणि हॉस्पिटल दोन महिन्यांत सुरू करावेत अन्यथा महापालिकेत आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महादेव बाबर यांनी दिला.
यावेळी हडपसर विभागप्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेविका मेधा बाबर, युवा नेतृत्व प्रसाद बाबर यांनी आपल्या भाषणात महापालिका प्रशासन व माजी नगरसेवकांवर जोरदार टीका केली. याप्रसंगी माजी नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, आसमा खान, महेंद्र भोजने, संजय सपकाळ, सचिन कापरे, अमर कामठे, मकरंद केदारी, अशोक पवार, अशोक लोणकर, प्रदीप पवार, गणेश कामठे, सचिन कामठे, नदीम शेख, शहबाज पंजाबी, हुसेन शेख, हाजी हुसेन शेख, रहीम शेख, प्रदीप पवार, श्रीकांत पवार, विकास बधे, अनिल जगताप, पुष्पा निकम, सविता गोसावी, शरिफा सय्यद यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते.