पुणे – मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आले आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. अंत्यदर्शनानंतर चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वच कुटुंबिया, नातेवाईक, चाहते पुण्यात दाखल झाले होते. आज दुपारी 2.30 वाजता विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
गोखले यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. आतापर्यंत आनंद माडगूळकर,मेघराज राजेभोले,दीपक रेगे,सुनील महाजन,राहुल सोलापूरकर,सुबोध भावे,सतीश आळेकर,संतोष चोरडिया,मिलिंद जसोही,योगेश सुपेकर,चंद्रकांत पाटील,मुक्ता बर्वे, मेधा कुलकर्णी अशा दिग्गजांनी गोखले यांचे अंत्यदर्शन घेतले.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गोखले यांचे काही गाजलेले चित्रपट, अभिनय –
मराठी – ‘या सुखानों या’, ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’
हिंदी – ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अर्धम’, भुलभुलैया.
वेब-सीरिज – ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’
सध्या विक्रम गोखलेंचा ‘गोदावरी’ सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी
विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या सिनेमाचे नाव ‘परवाना’ असे होते. दरम्यान, विक्रम गोखले यांना बालपणीच अभिनयाची गोडी लागली होती. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच कमलाबाई कामत यादेखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीदेखील अनेक सिनेमांत काम केलं आहे.
हेही वाचा – माझा हा दुसरा गुरूही गेला; अभिनेते शरद पोंक्षे शोकाकुल