पुणे, दि. 17 -शहरातील वनाज ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम दि. 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मेट्रोचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास करता येणार येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांनी मेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेट्रोच्या बैठकीवेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
मार्च 2023 अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या 33 किलोमीटरच्या मेट्रो लाइनचे काम पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरात किती कामे सुरू आहे. किती कामे पूर्ण झाली आहेत, याची माहिती घेण्यात आली. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्या दृष्टीने उपयुक्त असून, या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.