मुंबई – शिवसेना नाव वापरण्यास मनाई आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालय ते निवडणूक आयोग असा प्रवास लांबल्यानंतर अखेर आज बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले असून शिवसनेच्या दोन्ही गटांना आता स्वत:ची वेगळी ओळख अर्थात नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्यांनी सुचविलेल्या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह मिळाले असून त्यामुळे या पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या म्हणजे शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या महानाट्यानंतर राज्यात निर्माण झालेली अस्थिरता आणि निर्माण झालेले मळभ दूर होऊन आता आकाश मोकळे झाले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मान्य केले असून त्यांनी सूचवलेले मशाल चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. तर त्यांचा विरोधी गट असलेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. मुख्यमंत्र्याच्या गटाला नक्की कोणते चिन्ह मिळणार हे उद्या म्हणजे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…”, असे ट्विट करून एकनाथ शिंदे यांनी नवीन नाव मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ट्विटसोबत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.