लोणावळा, दि. 29 (वार्ताहर) -आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्ष चिन्ह कोणाला मिळणार, या विषयात तुम्ही पडू नका, बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. अडचणी च्या काळात जो शिवसेने सोबत आहे तोच खरा शिवसैनिक आहे, असे मत
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, शांताराम भोते, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी विजय तिकोणे, शैला खंडागळे व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहित आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांनी माझ्या उद्धव व आदित्य यांना सांभाळा असे सांगितले आहे. त्यांच्या सोबत काम करा. कोर्टाचा निकाल येऊ द्या मग बघू असे काही जण म्हणत आहे. पण काय व्हायचं ते होऊ दे, आपण बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहायचे, असे सांगत संघटनेचे काम बुथ स्तरावर जाऊन करा, सरकार जेथे चुकेल तेथे रस्त्यावर उतरा. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारी शिवसेना आहे. आता शब्द हीच तलवार आहे. तेव्हा दगडांना शिवसेनाप्रमुखांनी घडविले आहे. आता संघर्ष आचार, विचारा ची तलावर घेऊन लढायचे आहे. मनात आत्मविश्वास ठेवा, तुम्ही जिंकू शकता, हा संकल्प करा ,असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.