पुणे, दि. 24 -पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान या नियुक्तीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही राज्य शासनाकडून शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडी सरकार कार्यरत असताना हे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते. ते देखील सर्वत्र “दादा’नावानेच परिचित आहेत. तर, चंद्रकांत पाटील यांनाही सर्वत्र “दादा’ म्हणूनच संबोधले जाते. त्यामुळे पालकमंत्री पद पुन्हा दादांकडेच राहिले आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) व भाजप सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटूनही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नव्हत्या. पालकमंत्र्यांच्या जागांवरुन शिंदे गट व भाजप यांच्यात एकमत होत नसल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या. तसेच आढावा बैठका होत नसल्याने विकास कामे ही रखडली होती असा आरोप केला जात होता.
दरम्यान, जून ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कोथरुड विधानसभात मतदार संघातून निवडून आले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीसे सरकार आले होते.
अनेक प्रकल्प विस्तार, मंजुरींच्या प्रतीक्षेत
कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यापासूनच पुणे पालिकेच्या कारभारावर वॉच ठेवला आहे. आता त्यांना जबाबदारी मिळाली असल्याने पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी मंजुरी मिळवून आणणे, पाठपुरावा करणे, निधी मंजूर करणे अशी यादी तयार आहे. यात प्रामुख्याने मेट्रो विस्तार, नदी सुधार प्रकल्प, समाविष्ट गावांना निधी पुरवठा, पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा, चांदणी चौक पूल, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प, नवे उद्योग आणणे, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देणे अशी कामे प्रस्तावित आहेत. त्यांना गती देण्याची गरज आहे.