नवी दिल्ली – नेशन्स करंडक हॉकी स्पर्धा यंदा 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाची सलामीची लढत कॅनडाशी होणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दिली आहे.
स्पेनमध्ये ही स्पर्धा होत असून त्यासाठी भारताचा महिला हॉकी संघ लवकरच विविध स्पर्धांमध्ये तयारीचा भाग म्हणून सहभागी होणार आहे. या सात दिवस चालणाऱ्या स्पर्धेत एकूण आठ देशांचे संघ सहभागी होत आहेत. सहभागी संघांची विभागणी दोन गटांत करण्यात आली आहे.
भारत, कॅनडा, जपान व दक्षिण आफ्रिका यांचा अ गटात समावेश आहे. तर कोरिया, इटली, यजमान स्पेन व आयर्लंड ब गटात आहेत. कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ 12 डिसेंबरला जपानशी व 14 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेशी खेळेल.
दोन्ही गटातील अव्वल दोन संघ 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. स्पर्धेचा अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवले होते. तसेच इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते.