नवी दिल्ली – रेल्वेच्या तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर रेल्वे प्रसासनाने मोठी कारवीा केली असून या कारवाई अंतर्गत 43 लाख रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अलीकडेच गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाला 8 मे रोजी राजकोटच्या मन्नन वाघेला (ट्रॅव्हल एजंट) याला पकडण्यात यश आले.
तो कोविड-19 या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर करून मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकीटे आरक्षित करत होता. त्यानंतर वाघेला याने दिलेल्या माहितीच्या आधारे कन्हैया गिरी अवैध सॉफ्टवेअरच्या विक्रेत्याला 17 जुलै रोजी मुंबईतून अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान, गिरीने वापी इथला ऍडमिन, डेव्हलपर अभिषेक शर्मा यांची नावे उघड केली. त्यांना 20 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. अभिषेक शर्माने या सर्व बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा ऍडमिन असल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, अमन कुमार शर्मा, वीरेंद्र गुप्ता आणि अभिषेक तिवारी या 3 आरोपींना मुंबई, वलसाड (गुजरात) आणि सुलतानपूर (उत्तर प्रदेश) येथून अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल या प्रकरणी आणखी काही संशयितांचा शोध घेत आहे.
हे आरोपी टेलिग्राम, व्हॉट्सप सारख्या सोशल मीडियाचा वापर करून अशा बेकायदेशीर सॉफ्टवेअरच्या विकासात आणि विक्रीत सहभागी होते. तसेच “आयआरसीटीसी’चे बनावट व्हर्च्युअल नंबर आणि बनावट वापरकर्ता आयडी पुरवत होते. या आरोपींकडे बनावट आयपी ड्रेस तयार करण्याचे सॉफ्टवेअर होते. त्याचा वापर ग्राहकांना प्रत्येक आयपी ऍड्रेसमागे मर्यादित तिकीटे मिळविण्यावरचे निर्बंध लागू होऊ नयेत, यासाठी केला जात होता.
त्यांनी डिस्पोजेबल मोबाइल नंबर आणि डिस्पोजेबल ईमेल देखील विकले जे “आयआरसीटीसी’चे बनावट युझर आयडी तयार करण्यासाठी ओटीपी पडताळणीसाठी वापरले जात होते. या आरोपींकडून 43 लाख 42,750 रुपयांची 1688 तिकीटे जप्त करण्यात आली. यापूर्वीही , त्यांनी 28.14 कोटी रुपयांची तिकिटे खरेदी केली आणि ती विकून मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळवले होते. (6 persons arrested for black market of railway tickets; 43 lakh tickets seized)