पुणे, दि. 31 -शहरातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना यंदाच्या गणेशोत्सवात मंदिराच्या ओट्याऐवजी चौकात करण्यात येणार आहे. यामुळे सजावटीसाठी जागा उपलब्ध होण्याबरोबरच भाविकांना गर्दीतही श्रींचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
तुळशीबाग मंडळाच्या श्रींची दरवर्षी मंदिराच्या ओट्यावर प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदा तुळशीबागेच्या तीन गल्ल्या एकत्र येतात, त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मुंबईच्या लालबाग राजाला भेट दिली. अरुंद गल्लीत विराजमान होणाऱ्या या बाप्पाचे नियोजन कसे केले जाते, याची माहिती कार्यकर्त्यांनी घेतली. त्यातूनच यंदा श्रींच्या प्रतिष्ठापनेची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष पवार यांच्यासह दत्ता कावरे, नितीन पंडित, गणेश रामलिंग, सुभाष सरपाले, स्वप्निल सरपाले यांनी प्रथमेश कामठे यांच्या सहकार्याने लालबागला भेट दिली. गणेशोत्सवातील नियोजनाचे बारकावे या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले. लालबागची अत्याधुनिक अभ्यासिका आणि शैक्षणिक पुस्तक लायब्ररीची संकल्पना कार्यकर्त्यांना विशेष भावली. तेथील अनुभव लक्षात घेऊन श्रींच्या प्रतिष्ठापनेची जागा यंदा बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.