बॅंकॉक – भारतीय बॅडमिंटन संघाने थॉमस व उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत जर्मनीचा 5-0 असा धुव्वा उडवला व विजयी सलामी दिली. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन याच्यासह किदाम्बी श्रीकांत, सात्विकराज रांकीरेड्डी, चीराग शेट्टी, आमआर अर्जुन, ध्रुव कपिला व एच. एस. प्रणोय यांनी आपापल्या एकेरी व दुहेरीच्या लढती जिंकल्या.
सेनने मॅक्स वेसीक्रीचेनवर 21-16, 21-13 असा विजय मिळवला. रांकीरेड्डी व शेट्टी जोडीने दुहेरीच्या लढतीत जोन्स राल्फी जेन्सन व मर्वीन शेडेल जोडीचा 21-15, 10-21, 21-13 असा पराभव केला.
श्रीकांतने केयी शेफरवर 18-21, 21-9, 21-11 असा विजय मिळवला. आमआर अर्जुन व ध्रुव कपिला जोडीने जेर्ने इयास व जॅन कोलीन व्होएल्केर जोडीवर 25-23, 21-15 अशी मात केली.
दिवसातील अखेरच्या लढतीत प्रणोयने मॅथियास किकलेत्झचा 21-9, 21-9 असा पराभव केला. या खएळाडूंच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने सर्व पाचही सामने जिंकत जर्मनीवर संपूर्ण वर्चस्व राखले.