मुंबई – अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने या दिवशी सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी साधून आली आहे.
मंगळवारी MCX (MCX Gold Price) वर सोन्याचा भाव 2.13 टक्क्यांनी घसरून 50 हजार 650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 2.14 टक्क्यांची मोठी घसरण झाली. चांदीचा भाव 62 हजार 970 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.
24 कॅरेट सोन्याचे भाव
सोन्याचा भाव 2 मे रोजी बंद झालेल्या बाजारभावावर कायम आहे. 2 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 51हजार 336 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. याशिवाय 22 कॅरेट सोने 51 हजार 130 आणि 20 कॅरेट सोने 47 हजार 024 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
999 शुद्धता असलेली चांदी 62 हजार 950 प्रति किलोवर पोहोचली. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने गेल्या दोन महिन्यांचा विक्रम मोडला आहे. IBJA नुसार, यापूर्वी 28 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याची किंमत 50 हजार 696 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 28 फेब्रुवारीपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही सत्रांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याचे संकेत यामागचे कारण आहे.