पुणे – पोपट दाखवण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलास खडकी येथील रेल्वे ब्रीजवरुन खाली ढकलण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलास दोघा स्त्रानिक व्यक्तींनी बोट नदीपात्रात नेऊन बाहेर काढले. याप्रकरणी एका तरुणाविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत निकाळजे (19, रा. बोपोडी ) असे आरोपीचे नाव आहे. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार तीचा 15 वर्षाचा मुलगा दुध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा गल्लीतच रहाणाऱ्या एका तरुणाने त्याला पोपट दाखवतो असे म्हणत रेल्वे ब्रीजवर नेले. तेथे त्याला पोपटाची पिल्ले ब्रीजखाली आहेत असे सांगितले.
यामुळे तो खाली वाकून बघत असतानाच त्याचे दोन्ही पाय धरुण त्याला ब्रीजवरुन खाली ढकलून दिले. तो नदीपात्रात पडल्यानंतर तेथील गवताला धरुन एका बेटावर उभा राहिला. यानंतर जोरजोरात रडत असताना काही स्थानिक नागरिकांनी त्याला बघितले. त्यांनी जवळील बोटीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. यामध्ये फिर्यादीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.तर त्याला ढकलून दिलेला तरुण मुलगा पळून गेला असून त्याचा शोध सुरु आहे.