मुंबई : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीकडून लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरुन टीका करत कुचिक यांना जामीन देण्यात आल्याने संताप व्यक्त केला होता. तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला होता. दरम्यान ही तरुणी अखेर समोर आली असून तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यात तिने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणारी तरुणी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. पण आज अचानक ही तरुणी जगासमोर आली . वृटत्तवाहिनीशी बोलताना तिने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. “आपण संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप तरुणीने केला आहे. तसेच महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो असेही तिने सांगितले आहे. “सर्वात प्रथम मी निलम गोऱ्हे यांना फोन केला होता. गुन्हा दाखल करण्याआधी मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना खूप फोन केले, पण त्यांनी उचलले नाही. मग नंतर मी संजय राऊतांना फोन केला होता,” अशी माहिती तरुणीने दिली आहे.
तसेच “संजय राऊतांनी पहिल्या वेळी फोन उचचला नाही, पण दुसऱ्या वेळी उचलला. यावेळी त्यांना मी तुमच्या पक्षातील या व्यक्तीने मला फसवलं असून लैंगिक अत्याचार करत गर्भपात करायला लावल्याचे सांगितले. त्यांनी मला निलम गोऱ्हेंशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, त्यांना अनेकदा फोन केले पण उचलत नाही आहेत. मग त्यांनी मी त्यांना फोन करतो आणि तुमचा नंबर देत संपर्क करायला लावतो असे सांगितले. त्यानंतर १०-१५ मिनिटात निलम गोऱ्हेंच्या पीएचा फोन आला आणि बंगल्यावर बोलावून घेतलं”.
“निलम गोऱ्हेंनी माझ्याशी संवाद काय झालं याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधी मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही,” असा दावा तरुणीने केला आहे.