नवी दिल्ली – युद्धामुळे अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले असतानाच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने रशियातील तेल उत्पादक कंपनीबरोबर 30 लाख टन क्रुड कमी दरावर खरेदी करण्याचा सौदा केला आहे.
24 फेब्रुवारी रोजी रशियावर निर्बंध घालण्यात आल्यानंतर भारताने रशियाबरोबर केलेला हा पहिलाच व्यवहार आहे. सूत्रांनी सांगितले की इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला हे क्रुड मेमध्ये मिळणार असून सध्याच्या बाजारभावापेक्षा 25 डॉलर कमी दराने रशिया हे तेल भारताला उपलब्ध करणार आहे. सध्या जागतीक बाजारात क्रुडचा दर 100 डॉलरच्या पुढे आहे.
निर्बंध घालण्यात आल्यानंतर रशियाने काही देशांना स्वस्त दरामध्ये बऱ्याच वस्तू उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या कंपनीकडून हे कच्चे तेल खरेदी करण्यात आले आहे. त्या कंपनीला तेलाचा पुरवठा भारतीय किनाऱ्यापर्यंत करण्याची जबाबदारी आहे. इराणवर अणू कार्यक्रमामुळे ज्या प्रकारचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, तशा प्रकारचे निर्बंध रशियावर घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या तेलाच्या खरेदीत फारसा प्रश्न निर्माण होणार नाही.
भारताने रशियाकडून तेल खरेदी केले तरी त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधावर परिणाम होणार नसल्याचे अमेरिकेने सूचित केले आहे. भारताला स्वस्त दरामध्ये रशियाचे कच्चे तेल उपलब्ध होणार असल्यामुळे भारताच्या वाढणाऱ्या चालू खात्यावरील तूटीवर परिणाम कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रशियाकडून कमी दरात तेल खरेदी केल्यामुळे भारतीय ग्राहकांना महागाईचा जास्त प्रमाणात सामना करावा लागणार नाही असे समजले जात आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशनप्रमाणे इतर काही तेल कंपन्या रशियाकडून लवकरच खरेदीचे व्यवहार करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येऊ लागले आहे. कदाचीत त्यामुळेच तेल कंपन्यानी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.