नवी दिल्ली – भारत सरकारने सन 2017 साली इस्त्रायलशी जो संरक्षण विषयक करार केला होता त्यात पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर खरेदी केले होते असा गौप्यस्फोट न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तात करण्यात आला होता. त्यामुळे मोदी सरकारपुढील अडचण वाढली होता. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेगासस स्पायवेअरविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
NSO ग्रुप आणि इस्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनी 4-5 वर्षांपूर्वी आमच्या पोलीस विभागात त्यांचे मशीन अर्थात पेगासस स्पायवेअर विकण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण मी ते नाकारले, कारण त्याचा राजकीय वापर न्यायाधीश/अधिकारी यांच्या विरोधात केला जाऊ शकतो, जो मान्य नाही, असं, ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
दुसरीकडे भारताने हे सॉफ्टवेअर खरेदीच केलेले नाही अशी भूमिका सरकारने प्रथम मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण विदेशातील काहीं संस्थांनी त्या विषयीची माहिती पुढे केल्यानंतर सरकारला बचावात्मक स्थितीत जावे लागले होते.
संरक्षण विषयक कराराद्वारे हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर खरेदी केले गेले आणि ते देशातील पत्रकार, उद्योगपती, विरोधी पक्षांचे नेते यांच्यावर वापरले गेले असे स्पष्ट झाले होते. आता ममता यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सरकार त्यावर काय खुलासा करणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.