पुणे – महापालिका सभागृहाची मुदत संपत असल्याने सोमवारी घेण्यात आलेल्या शेवटच्या औपचारिक सभेत पालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गेली पाच वर्षे मुख्यसभेसह, प्रभाग समित्यांच्या बैठकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत वेळप्रसंगी हमरीतुमरीवर येणारे सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुन्हा सभागृहात येण्यासाठी एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
तर कोणी शेरोशायरी ऐकवित तर कोणी गेल्या पाच वर्षात घडलेले गमतीदार किस्से सांगत सभागृहात हशा पिकवला. मात्र, यावेळी काही नगरसेविकांना आपले अश्रू अनावर झाले.
त्यामुळे सभागृहातील वातावरणही एकदम शांत झाल्याचे पाहायला मिळाले. तर सभागृहात बोलण्यास संधी न दिल्याने काही नगरसेवकांनी सभागृहातून निघून जात शेवटच्या दिवशी नाराजी व्यक्त केल्याचेही पहायला मिळाले.
सभेची सुरूवात ज्येष्ठ नगरसेवक गोपाळ चिंतल यांच्या मनोगताने झाली. त्यांनी आठवणींना उजाळा देत सभागृहाची सांस्कृतिक परंपरा स्पष्ट केली. त्यानंतर नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, मुक्ता जगताप, आरती कोंढरे, नंदा लोणकर, पल्लवी जावळे, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रशांत जगताप, दीपक मानकर, भैय्यासाहेब जाधव, अजय खेडेकर, अजित दरेकर आदींनी मनोगत व्यक्त करत हे सभागृह राजकीय विद्यापीठ असल्याचे गौरवोद्गार काढले.
ड्रेनेज गोल, की चौकोनी?
“न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेच नगरसेवक झालो. पहिल्याचा दिवशी नागरिकाचा फोन आला ड्रेनेज तुंबलेले आहे. ते साफ करण्याचे काम करताना ते गोल आणि चौकोनी अशी दोन प्रकारची कारणे आहेत हे पण नव्याने कळाले. ती साफ करायला वेगवेगळे कर्मचारी आहेत हे पण कळाले,’ याचा समन्वय घालताना कसा गोंधळ उडाला याचा मजेशीर किस्सा भैय्यासाहेब जाधव यांनी सभागृहात सांगितला, त्यावेळी सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. तसेच भैय्यासाहेब जाधव यांनी मी पाच वर्षांत एकदाही फ्लेक्स किंवा होर्डिंग लावले नाही असे सांगितले.
“गेल्या पाच वर्षांचा प्रवास कसा संपला हे कळाले नाही. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनीही चांगले काम केले. पक्ष, विचार, तत्व वेगळे असेल तरी विकासासाठी व करोनाच्या काळात सत्ताधारी व विरोधक एकत्र होते. शहराचा प्रथम नागरिक म्हणून नेहमीच शहर विकासासाठी आग्रही राहिलो, याचे समाधान आहे. – मुरलीधर मोहोळ,महापौर
गेल्या पाच वर्षांतील शहर विकासाचे केंद्र बनलेले हे सभागृह आहे. या सभागृहात सर्व मोठ्या प्रकल्पाचे निर्णय घेतले गेले असून, या सर्वांचे आपण साक्षीदार आहोत, याचा अभिमान आहे. विरोधक-सत्ताधारी यांच्यात मतं-मतांतरे होती, पण विकासात एकत्र येत पुण्याची राजकीय संस्कृती सभागृहाने दाखवून दिली आहे. – गणेश बीडकर, गटनेते, भाजप