पवनार (वर्धा) – आचार्य विनोबा भावे यांच्या मौनाच्या कालखंडात म्हणजेच डिसेंबर 1975 पर्यंत सर्व सेवा संघाच्या हालचाली स्थगित करण्याचा निर्णय आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी घेतला. सर्व सेवा संघ अस्तंगत होण्याचा धोका टाळण्यासाठी विनोबांनी आज सकाळी काही काळ आपले मौन सोडले होते.
सीमा-प्रश्न निवडणुकीपूर्वी सुटेल!
पुणे – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सलोख्याने सुटावा अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. परंतु कर्नाटकाची मात्र तशी तयारी नाही. तरीही येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सुटेल अशी मला आशा वाटते, असे उद्गार चव्हाण यांनी काढले.
अमेरिकेजवळ अण्वस्त्रांचा प्रचंड साठा
वॉशिंग्टन – अमेरिकेचे सेवानिवृत्त ऍडमिरल जीन ला रोक यांनी असे जाहीर केले की, अमेरिकेजवळ अमाप अणुशस्त्रे आहेत. किमानपक्षी सर्व तऱ्हेची मिळून
30 हजारांवर अणुशस्त्रे असावीत.
पालिका कायद्याचे अधिकार आयुक्तांकडेच ठेवणार
पुणे – महापालिका कायद्याचे अधिकार आयुक्तांकडेच ठेवण्याचे धोरण शासनाचे राहील. लोकप्रतिनिधींना कायदा अंमलबजावणीचे अधिकार वाढवून देणे योग्य ठरणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी महापालिका स्वागतास उत्तर देताना मांडली. ते म्हणाले, याबाबत मूलभूत तत्त्वज्ञान बदलणे शक्य नाही.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम 3 वर्षांचा करण्याचा निर्णय
मुंबई – पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाची मुदत कमी करून चार वर्षांऐवजी तीन वर्षे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याची घोषणा शिक्षणमंत्री प्रभा राव यांनी विधान परिषदेत केली. समाजवादी पक्षाचे नेते आमदार ग. प्र. प्रधान यांच्या तहकुबी सूचनेच्या संदर्भात प्रभा राव यांनी हे निवेदन केले. मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांनी धमकी दिली होती. नव्या निर्णयामुळे सहाव्या सेमिस्टरच्या अखेरीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.