तेजस फडके
निमोणे – निवडणुका जवळ येताच पक्षांतरासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेते मंडळींकडून विरोधी पक्षातील नेते आपल्या संपर्कात असल्याचे दावे-प्रतिदावे रंगू लागतात. त्याच पार्श्वभूमीवर सध्या शिरूर तालुक्यातील गाव पुढाऱ्यांना सत्ताधारी पक्षाचा आधार घेत पक्ष प्रवेश
करून आपले स्थान मजबूत करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यात नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद मेळाव्यात शिरूर तालुक्यातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
सध्या महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असल्याने अनेक जण स्वगृही परतणार असल्याने मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याची चर्चा शिरूरमधील गावागावांत सुरू झाली आहे. निवडणुका जवळ येत आहेत.
तशी-तशी राजकीय पक्षातली चढाओढ देखील दिसून येत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच आजी- माजी पदाधिकारी आणि इच्छुकांकडून आपल्याला कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळू शकते. याची चाचपणी सुरू आहे.
शिंदोडी (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी निमोणे (ता. शिरूर) परिसरातील भाजपचे अनेक पुढारी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले.
आम्ही गेली 25 ते 30 वर्षे भाजपसोबत प्रामाणिक असुनही पक्षाने आम्हाला काहीच दिले नाही. अशी चिखलफेक केली. पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना गट-तट विसरुन आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गावच्या विकासासाठी हे गरजेचं आहे. काही जुने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचाही आम्ही योग्य सन्मान ठेऊन नव्यांना पक्षात प्रवेश देत आहोत, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी सांगितले.
जिकडं भंडारा तिकडं उदो! उदो!
शिंदोडी गावचे सरपंच अरुण खेडकर यांनी नुकताच सणसवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. गावच्या विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी कमळाची साथ सोडून हातात घड्याळ घातल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. वडील दौलत खेडकर हे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे समर्थक तर मुलगा राष्ट्रवादीमध्ये आल्याने फक्त सरपंचपद टिकावे यासाठी हा प्रवेश केल्याची दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.