पणजी – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तोतया आहेत. ते भाजपच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. हुकूमशाही कार्यपद्धती, वर्तणूक पाहता केजरीवाल म्हणजे छोटे मोदीच आहेत, अशी शाब्दिक तोफ कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी गुरूवारी डागली.
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) गोवा आणि उत्तराखंडची विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्याचा संदर्भ घेऊन सुर्जेवाला यांनी येथे पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे त्या पक्षाला मदत करण्याच्या उद्देशातून आप दोन्ही राज्यांच्या निवडणूक रिंगणात उतरला आहे.
आम आदमीविषयी बोलणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षाकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा कुठून येतो? दिल्लीत कॉंग्रेसचे सरकार असताना जाहिरातींवर 100 कोटी रूपयांचा खर्च व्हायचा.
त्याउलट, केजरीवाल सरकारने जाहिरातींसाठी 1 हजार 100 कोटी रूपयांची उधळपट्टी केली आहे. आपच्या राजवटीत दिल्लीत अनेक घोटाळे झाले. त्यातील 10 टक्के घोटाळ्यांचा तपास झाला तरी केजरीवाल तुरूंगात जातील, असा दावाही सुर्जेवाला यांनी केला.