गयाना – भारताविरुद्धच्या एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. संघात वेगवान गोलंदाज केमार रोचने तब्बल अडीच वर्षांनी पुनरागमन केले आहे. संघाचे नेतृत्व कॅरन पोलार्डकडेच कायम ठेवण्यात आले आहे.
ही मालिका दि. 6 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामने होतील. हे तिन्ही सामने आयसीसीच्या एकदिवसीय सुपर लीगचा भाग आहेत.
पहिल्या सात संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी वेस्ट इंडिजला सरस गुणांसह हे सामने जिंकावे लागणार आहे. या मालिकेत घरच्या मैदानावर खेळत असलेल्या भारतीय संघाचेच पारडे वरचढ राहणार असल्याचे दिसत आहे. टी-20 मालिकेचे सर्व सामने कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर 16, 18 आणि 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
वेस्ट इंडिजचा अनुभवी वेगवान गोलंदाज केमर रोचला सातत्याने दुखापतींमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. तसेच त्याला या काळात अन्य लीग स्पर्धेतही फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, त्याचा भारतीय संघाविरुद्धचा अनुभव तसेच तो पूर्ण तंदुरुस्त ठरल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोचने वेस्ट इंडिजकडून 92 एकदिवसीय सामने खेळताना 124 बळी घेतले आहेत.
वेस्टइंडिजचा संघ –
कॅरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमा बोनर, डॅरेन ब्राव्हो, शेमार ब्रुक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारिया शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेल्डन वॉल्श.