मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच, जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते ‘दिलीप जोशी’ ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. या मालिकेचे बहुतेक कलाकार गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेशी संबंधित आहेत. पण, या मालिकेत असे अनेक कलाकारही होते, ज्यांनी हा शो सोडला किंवा त्यांची जागी इतर नवीन कलाकारांनी घेतल्या. मात्र, या शोचे मुख्य पात्र जेठालाल मालिकेतून बाहेर पडणार की काय, या विचाराने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
या शोबद्दलच्या एका इंस्टाग्रामवर पेजवरून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माते असितकुमार मोदी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर ‘सौरभ घाडगेला’ ‘जेठलाल’च्या भूमिकेत घेणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. टीव्ही जगतातील सर्वात जास्त काळ चालणारा शो ‘तारक मेहता’बद्दल केलेल्या या पोस्टमध्ये सौरभ घाडगे ‘जेठालाल’च्या पात्राला मागे टाकू शकतो, असे म्हटले होते. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने सुद्धा याबद्दल माहिती दिली आहे.