इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये आयोशा मलिक या महिलेने प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदाची आज शपथ घेतली. पाकिस्तानात महिलांना न्यायापासून वंचित ठेवले जाते अशी टीका नेहमीच केली जाते. त्याचवेळी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून शपथ घेणे हा पाकिस्तानातील ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. आयेशा मलिक या इस्लामाबादेत 16 अन्य पुरुष न्यायाधीशांसमवेत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार आहेत.
आयेशा मलिक यांचे शिक्षण हार्वर्ड येथे झाले आहे आणि त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून न्यायादानाचे काम केले आहे. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर न्यायदान केले आहे. महिलांसाठी अपमानकारक असलेल्या लैंगिक अनुभव चाचणीवर बंदी घालण्याचा महत्वाचा निर्णयही मलिक यांच्याच न्यायालयात देण्यात आला होता.
मलिक यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानात आतापर्यंत अन्याय होत असलेल्या नहिलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र त्यांची ही बढती देखील वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बढतीसाठी त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी असलेल्या पुरुष न्यायाधीशांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.