जवळार्जून – येथील खंडोबा देवाची पौष पोर्णिमेनिमित्त खंडोबा देवाची यात्रा सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने दरवर्षी जेजुरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार सुरू झाला आहे. या बाजारासाठी अठरा पगड जाती जमातीतील समाज बांधव सहभागी झाले आहेत. शुक्रवार पासूनच या बाजारात गाढवांची खरेदी विक्री सुरू झाली असून 20 हजार रुपयांपासून ते 45 हजार रुपये पर्यंत एका गाढवाला किंमत मिळत आहे. यंदा बाजारात दीड ते दोन कोटींची उलाढाल झाली. परंतु करोनाच्या भीतीचे यंदा बाजारावर संकट आल्याने बाजारात गाढवांची आवक कमी दिसून आली.
जेजुरीच्या बंगाली मैदानात अनेक पिढ्यांपासून गाढवांचा बाजार भरतो. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. अशा समाजातील नागरिक गाढवांच्या खरेदी विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी प्रत्येक पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात. वडार, बेलदार, वैदू, कैकाडी, गारुडी, कुंभार, भातुकोल्हाटी, परीट आदी अठरा पगड जातीजमातीचे, बलुतेदार समाजाचे नागरिक या यात्रेत सहभागी होतात.
जेजुरी, मढीव, माळेगाव येथे दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. जेजुरी येथे दोन ते तीन दिवस चालणाऱ्या गाढवांच्या बाजारासाठी गुजरातमधील अमरेली, सौराष्ट्र या भागातून सुमारे सव्वाशे गाढवे विक्री साठी येथे आली आहेत. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, परभणी, सातारा भागातून सुमारे सहाशेहून अधिक गाढव दाखल झाले आहेत. गाढवांची किंमत त्यांची वये व दातावरून ठरत असते. दात नसलेले कोरा, दोन दाताचे दुवान, चार दाताचे चवान तर संपूर्ण दात असलेल्या गाढवाला अखंड म्हणून ओळखले जाते. गावठी गाढवांची 10 हजार ते पंचवीस हजारापर्यंत विक्री होत आहे तर काठेवाडी गाढवांना चांगली किंमत असून पंचवीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत विक्री झाली.
“गाढवाच्या दुधाचा पूर्वीपासून व्यापार करत आहे. लहान मुलांना दम्या सारखा विकार असल्यास त्याला औषध म्हणून गाढवाचे दूध पाजले जाते. एक चमचा दुधाचे शंभर रुपये मिळतात तर एका लिटरला सात हजार रुपये भाव मिळतो.”
– रमेश जाधव, व्यापारी पुणे
“जेजुरी येथील बाजारात 65 गाढवे विक्रीसाठी आणली होती. शनिवारीच सर्व गाढवांची विक्री झाली आहे. अनेक पिढ्यांपासून खंडोबा देवाचे दर्शन, गाढवांची खरेदी विक्री व कुस्त्यांच्या आखाड्यासाठी आम्ही येत असतो. परंतु यंदा गाढवांची संख्या कमी होती.”
– बाबू खंडू मोरे, गाढव विक्रेते उस्मानाबाद