पुणे : जपानची टेनिस सेन्सेशन नाओमी ओसाका ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू ठरली आहे. प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने जाहिर केलेल्या यादीत, ओसाका 2021 मध्ये 57.3 दशलक्ष डॉलर कमवत अव्वल स्थानी राहिली आहे.
यामध्ये ओसाकाला जाहिरात आणि प्रायोजकत्वातून 55 दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. तर ओसाकाची बक्षिसाच्या रकमेतून 2.3 दशलक्ष डॉलर कमाई झाली आहे. नाओमीने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
नाओमी ओसाकाने तीच्या आतापर्यंतच्या लहाण कारकिर्दीत महिला एकेरीत चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यात (2018 आणि 2020) यूएस ओपन तर (2019 आणि 2021) ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे.
कोण आहे नाओमी ओसाका ?
नाओमी ओसाकाचा जन्म 16 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तीची आई जपानी तर वडिल हैतीयन आहेत. ती 3 वर्षांची असताना तिच्या कुटुंबासह न्यूयॉर्कला स्थलांतरित झाली. 2013 मध्ये जपानचे प्रतिनिधीत्व करत तिच्या व्यावसायिक कारकीर्दीला अधिकृतपणे सुरूवात झाली. 2018 मध्ये ओसाकाने वयाच्या 19 व्या वर्षी यूएस ओपनचा अंतिम सामन्यात दिग्गज सेरेना विल्यम्सला पराभूत करून मोठी छाप सोडली. यामुळे ग्रँडस्लॅम जिंकणारी ती जपानमधील पहिली टेनिसपटू ठरली.
नाओमीचे पहिले प्रशिक्षक वडिल होते
नाओमी ओसाका सध्या जरी विम फिसेट यांच्याकडून प्रशिक्षण घेत असली तरी तीचे पहिले प्रशिक्षक वडिल होते. ओसाकाने प्रथम तिचे वडील लिओनार्ड फ्रँकोइस यांच्या हाताखाली टेनिस खेळायला सुरुवात केली, ज्यांनी सेरेना आणि व्हीनससारखे मॉडेल वापरत, ओसाका आणि तिची बहीण मारी या दोघींनाही बालपणापासून प्रशिक्षण दिले. नाओमीच्या वडिलांनी 1999 मध्ये सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या दोन्ही बहिणींना फ्रेंच ओपनमध्ये खेळताना पाहिले होते, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या दोन मुली नाओमी आणि मारी यांना टेनिस खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले.
नैराश्याची शिकार
नाओमी ओसाकाने मानसिक आरोग्यामुळे 2021च्या फ्रेंच ओपनमध्ये खेळण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेलेल्या नाओमीने सराव सामना खेळत विजय मिळवला होता. पण नंतर अचानक नाओमी ओसाकाने मानसिक आरोग्याचे कारण देत फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती.
कल्पना करा की अशी टेनिसपटू, जी अप्रतिम प्रतिभेने समृद्ध आहे, तिच्या आयुष्यात यशस्वी आहे, टेनिसमध्ये चार वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे, जीच्याकडे संपत्तीची कमतरता नाही आणि जी लोकांसाठी प्रेरणा आहे, त्या खेळाडूला सर्वकाही असूनही, नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी झुंज द्यावी लागते.
टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली आशियाई खेळाडू
2018 मध्ये यूएस ओपन आणि 2019 ऑस्ट्रेलिया ओपन जिंकून, नाओमी ओसाकाने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी जागतिक जेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली आशियाई आणि जपानी खेळाडू ठरली.
वांशिक हिंसाचाराच्या विरोधात लढा
नाओमी ओसाका वांशिक हिंसाचाराच्या विरोधात देखील आवाज उठवत आहे. 2020 मध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जेकब ब्लेक पोलिसांच्या क्रूरतेचा बळी ठरला होता.
या घटनेच्या निषेधार्थ, नाओमी ओसाकाने वेस्टर्न आणि सदर्न ओपनच्या उपांत्य फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सामना दिवसभरासाठी पुढे ढकलावा लागला. नंतर ओसाका उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आणि ’ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ लिहिलेला टी-शर्ट घालून कोर्टवर उतरली.
2020 यूएस ओपन 2020 मध्ये, ओसाकाने पोलिसांच्या क्रूरतेला बळी पडलेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांची नावे असलेले मुखवटे घातले होते. तर अंतिम सामन्यात, तीने वंशवादाला बळी पडलेल्या तामिर राईस नावाच्या 12 वर्षांच्या मुलाच्या नावाचा मुखवटा घातला होता.