पुणे – मुक्ताई प्रॉडक्शन या संस्थेतर्फे आयोजित ‘यमक वगैरे’ ही मैफल श्रोत्यांच्या प्रतिसादात रंगली. कविता, शेर, तुकडे अशी साहित्याची रेलचेल आणि संगीत अशी बहारदार मेजवानी रसिकांनी अनुभवली. नवीन वर्षाची काव्य आणि संगीतमय सुरुवात झाली.
यमक वगैरेचा अकरावा प्रयोग एस. एम. जोशी सभागृहात पार पडला. प्रत्येक प्रयोग नवखा ही खासियत या प्रयोगावेळीही जाणवली. रंगमंचाच्या ओढीने एकत्र आलेले आदित्य महाजन, मयूरी मंडलिक , निरंजन माळोदे आणि श्रुती घायाळ यांनी नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम बहारदार केला. गिटार वादक ओम पिंपळगावकर, बासरी वादक प्रीतम देवडीकर , काहोन वादक प्रसाद कोठावळे , तबलावादक अमित लिमये आणि गायक अविनाश विजय यांनी साथसंगत केली.
भाषेचे बंधन ओलांडणाऱ्या या मैफलीने प्रेक्षकांची सायंकाळ समृद्ध केली. कार्यक्रमात स्वलिखित कविता, चारोळ्या आणि शायरी सादर झाली. यमक या वेगळ्या कल्पनेतून शारद सुंदर , दिल चीज क्या है किंवा अगर तुम साथ हो या सारखी गाणी वेगळ्या पद्धतीने सादर झाली. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून रसिकांनी मैफलीला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची योजना २०१९ मध्ये आदित्य महाजन याने आखली. दर्जेदार स्वरचित कविता, साहित्य आणि संगीत युवा पिढी सादर करू शकते आणि सगळ्या वयोगटाच्या श्रोत्यांना ते आवडू शकते, हा या मैफलीचा उद्देश आहे, असे आदित्यने सांगितले.